कॅम्प

आनंदपीठ समर कॅम्प 2026

समता आणि प्रेमातून उगवलेले आनंदी जग साकारण्यासाठीची पेरणी

आनंदपीठ कॅम्प@भालगुडी DAYS!

‘टीन एज’ वादळी असतं हे खरंच, पण हेच वय घडवतं, बिघडवतं… म्हणून, हा कॅम्प.

१३ ते १९ वर्षे या वयोगटातील मुला-मुलींसाठी

रील्सच्या दुनियेतून बाहेर पडून रिअल जग पाहायचंय? व्हाट्सॲप विद्यापीठातून बाहेर पडायचंय? स्वतंत्र विचार करण्याची क्षमता हवीय? करीअरच्या भन्नाट वाटा दिसायला हव्यात? जात-पात-धर्म-लिंग या पल्याड ‘माणूस’ व्हायचंय? मुख्य म्हणजे, आनंदानं आयुष्य जगायचंय?

मग, आनंदपीठ कॅम्प तुमच्यासाठीच.

अनेक नामवंत इथं येतील. मुलांसोबत बागडतील. नव्या वाटा दाखवत जगणं समृद्ध करतील. कुठे असेल ही छावणी?

पुण्यापासून तासाभराच्या अंतरावर. सह्याद्रीच्या कुशीत, निसर्गरम्य डोंगरावर. शेजारी तिकोना, तुंग, लोहगड… इकडेच पवना डॅम, समोर हाडशी लेक.

कधी? ३ मे ते ८मे २०२६

आजच नोंदणी करा. गुगल फॉर्म भरून पाठवा.

मग मुलाखती होतील. पन्नास जणांनाच संधी.



आनंदपीठ आयोजित सहावा युथ-कॅम्प

आनंदपीठ आयोजित सहावा युथ-कॅम्प आनंदपीठाच्या निसर्गरम्य परिसरात १२ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत यशस्वीरित्या पार पडला. या कॅम्पमध्ये नंदुरबार, धुळे, नाशिक, जळगाव, यवतमाळ, पुणे, सातारा, सोलापूर, हिंगोली आणि अहिल्यानगर या दहा जिल्ह्यांतील एकूण ५२ विद्यार्थी सहभागी झाले. अतिशय उत्साहपूर्ण आणि धुमधडाक्यात हा कॅम्प पार पडला.

विविध क्षेत्रांतील दिग्गज व्यक्तींनी मार्गदर्शनपर सत्रे घेत विद्यार्थ्यांना प्रेरणा दिली. नेचर वॉकदरम्यान विद्यार्थ्यांनी तिकोना किल्लाही सर केला. जळगावच्या विद्यार्थ्यांनी अहिराणी गाण्यावर पारंपरिक नृत्य सादर करत सांस्कृतिक कार्यक्रम रंगतदार केला. विद्यार्थ्यांच्या कलागुणांना आनंदपीठाने व्यासपीठ उपलब्ध करून देत त्यांना सातत्यपूर्ण प्रोत्साहन दिले.

-आनंदपीठ

Student's Politics - Anandpeeth Youth Camp

स्टुडंट्स पॉलिटिक्स- आनंदपीठ यूथ कॅम्प!

राजकारणात करियर घडवू पाहणाऱ्या तरुणांसाठी एकदिवशीय कॅम्प आनंदपीठावर आयोजित करण्यात आला. या कॅमसाठी प्रामुख्याने वेगवेगळ्या जिल्ह्यातून विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी, वेगवेगळ्या क्षेत्रातील तज्ञ आणि अनुभवी वक्त्यांनी मार्गदर्शन केले. राजकारणाच्या दृष्टीने वेगवेगळ्या ग्रुप ऍक्टिव्हिटीजही घेण्यात आल्या.

आनंदपीठ आणि साथी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामानाने आनंदपीठ येथे 13 ते 18 वयोगटातील मुलांसाठी शिबिर झाले.

आनंदपीठ आणि साथी प्रतिष्ठान यांच्या संयुक्त विद्यामानाने आनंदपीठ येथे 13 ते 18 वयोगटातील मुलांसाठी शिबिर झाले.

शिबिराचे उद्घाटन संभाजी भगत यांच्या हस्ते झाले. समारोप जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते झाले.

चार दिवसाचे शिबिर साथी प्रतिष्ठानचे सर्वेसर्वा राजेंद्र भोसले आणि आनंदपीठाचे संकल्पक संजय आवटे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडले. कॅम्पमध्ये दररोज सकाळी अभिषेक पालेकर यांनी मेडिटेशन आणि योगासन यांचे प्रात्यक्षिक घेतलं, पहिल्या दिवशी शीतल यशोधरा यांचे संविधान आणि आपण यावर सत्र झालं. दुपारच्या जेवणानंतर हर्षल पाटील यांनी अभिनय, स्पष्ट वक्तृत्व यावर सत्र घेतलं. सायंकाळपर्यंत मुलांनी त्यांच्या कल्पनेतून स्वतःच एक नाटक बसवलं. शुभेच्छा दुसऱ्या दिवशी सचिन निंबाळकर यांचा चित्रकला यावर सत्र झालं, त्यामध्ये मुलांनी ड्रेसिंग पेपरवर उत्तम चित्र रेखाटले, विदुर महाजन यांच्या सतारी वादनाचे सत्र मुलांना विशेष भावले राग यमन शास्त्रांमध्ये मुलांसह स्वयंसेवकही भारावून गेले. त्यानंतर अपूर्ण महाजन यांच्या चित्ररूपी गोष्टीत मुले दंग झाली. सायंकाळी संजय आवटे यांची सत्र झाले. यामध्ये गांधी नेहरू आंबेडकर यांनी घडवलेल्या भारत आणि आताचा भारत यावर मुलांनी चिंतन केले. सायंकाळी शीतल सोनवणे यांचे अर्थशास्त्र या विषयावर सत्र झाले. आपल्या घरातील कुटुंबाच्या बजेट पासून ते राज्य आणि देशाच्या बजेट पर्यंत वेगवेगळ्या संकल्पना त्यांनी मुलांना समजावून सांगितल्या. सायंकाळी साथी प्रतिष्ठानच्या मुलांनी चळवळीतील गाणी सादर केले. शाहीर आणि सादर केलेल्या शाहिरीने कार्यक्रम टिपे ला पोहोचला. याच दिवशी शिबिरार्थी वैष्णवी आणि कॅम्प डायरेक्टर दीपक होमकर यांचा वाढदिवस केक कापून जल्लोषात सादर करण्यात आला.

शिबिराच्या तिसऱ्या दिवशी मला पहाटे नेचर वॉक आयोजन करण्यात आले. अनिकेत मोताळे यांनी परिसरातील झाडांच्या प्रजाती, पक्ष्यांचे प्रकार, पानवटे यांची माहिती दिली. त्यानंतर दुपारी जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांच्या हस्ते शिबिरार्थींना प्रमाणपत्राची वाटप झाले. सायंकाळी डॉ. नीरज जाधव यांचे मुलांचे आरोग्य या विषयावर सत्र झाले. त्यानंतर आशुतोष शिर्के आणि राजीव तांबे यांचे सत्र झाले. त्यानंतर मानसशास्त्राची विद्यार्थी करण, निशा, धनश्री यांनी मानसशास्त्रावर प्रात्यक्षिक आणि सत्र घेतले यामध्ये मुलांनी त्यांच्या मनात असलेली गुपिते शेअर केली. सायंकाळी साथी प्रतिष्ठानच्या कलावंतांनी गाणी नाटक सादर करत शिबिरामध्ये सांस्कृतिक रंग भरला.

चौथ्या आणि समारोपाच्या दिवशी भल्या पहाटे पाच वाजता तिकोना गड सर करण्यासाठी मुले गावाच्या दिशेने चालू लागली. बालवाडी गावातून बसचा प्रवास सुरू झाला. बस मध्येच गडाकडे जाताना छत्रपती शिवाजी महाराजांचे पोवाडे दुमदुमायला लागले. गडाच्या पायथ्याशी बस थांबली तिथे नाश्ता झाल्यावर शिववंदना गाऊन मुलांनी पायी गडसर करायला सुरुवात केली. साधारणतः दीड तासांमध्ये सर्व मुले गडावर पोचली. दुपारी परतल्यावर निरोप समारंभाचे गोडाधोडाचे जेवण झाले. त्यानंतर साथी प्रतिष्ठानचे प्रमुख राजेंद्र भोसले यांच्या भाषणाने कार्यक्रमाचा समारोप झाला. रात्री आठच्या सुमारास मुले शिबिरातून बसने रवाना झाली.